नेपाळमध्ये भीषण अपघात! व्हॅन खोल दरीत कोसळली; १० जणांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

Foto
काठमांडू : नेपाळमधील मकवानपूर जिल्ह्यात गुरुवारी एक भीषण अपघात झाला आहे. काठमांडूहून हेटौंडाकडे जाणार्‍या प्रवाशांनी भरलेली एक ईव्ही हायस व्हॅन ७०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात चालकासह १० जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
ईव्ही हायस व्हॅन गुरुवारी सकाळी सर्लाही जिल्ह्यातील प्रवाशांना घेऊन काठमांडूहून हेटौंडाकडे जात होती. याच दरम्यान, भीमफेदी-कुलेखानी-काठमांडू महामार्गावर चिसापानीगढी जवळ चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि व्हॅन थेट खोल दरीत जाऊन कोसळली. या अपघातात जीव गमावलेल्यांमध्ये तीन महिला, दोन लहान मुली आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. १० जणांचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलीस मृतांची ओळख पटवण्याचं काम करत आहेत. या अपघातातील पाचही जखमींना उपचारासाठी हेटौंडा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

१० सीटर गाडीत होते १५ प्रवासी
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ईव्ही हायस गाडीची प्रवासी क्षमता केवळ १० जणांची होती, त्यामध्ये चालकासह एकूण १५ जण प्रवास करत होते. म्हणजेच गाडीत क्षमतेपेक्षा पाच प्रवासी अधिक बसवण्यात आले होते. मृत आणि जखमी झालेले सर्व प्रवासी सर्लाही जिल्ह्यातील चक्रघट्टा ग्रामपालिका-४ येथील सुंदरपूर गावचे रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींमध्ये ३३ वर्षीय मुकेश यादव, ५ वर्षीय सक्षम कुमार यादव आणि ३ वर्षीय सुदन यादव यांचा समावेश आहे. 

प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य
अपघाताची माहिती मिळताच नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल, नेपाळी लष्कर आणि बागमती प्रदेश आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तुकड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सर्वांनी मिळून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू केले. मकवानपूर जिल्हा पोलीस कार्यालयाचे पोलीस अधीक्षक () श्यामबहादूर खत्री यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकही घटनास्थळी पोहोचले. हे ठिकाण भीमफेदी विभागीय पोलीस कार्यालयापासून आठ किलोमीटरवर आहे.